नवी दिल्ली - कुरानमधील 26 आयत हटवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात विवादित याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. तसेच रिझवी यांना कोर्टाने 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. कुरानमधील 26 आयत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत त्यांनी याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती आरएफ नरिमन, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सोमवारी ही याचिका फेटाळून लावली. कुराणच्या 26 आयतामुळे (श्लोक) दहशतवादाला चालना मिळते. इस्लाम हा समानता, चांगुलपणा, क्षमा आणि सहनशीलता या संकल्पनेवर आधारित आहे. परंतु कुरानच्या 26 आयातामुळे धर्म मूलभूत तत्त्वांपासून दूर जात आहे, असा युक्तीवाद रिझवी यांनी आपल्या याचिकेत केला होता.
मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या -
रिझवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी आणि इस्लामिक धार्मिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. गेल्या महिन्यात बरेली येथे रिझवींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होता. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अनेक मौलानांनी आपल्या समर्थकांसोबत रिझवी यांच्या घराच्या बाहेर निदर्शने केली. शिया आणि सुन्नी धर्म गुरुंनी रिझवी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.
पुनरावलोकन याचिका दाखल करणार -
याप्रकरणी आता वसीम रिझवी पुनरावलोकन याचिका दाखल करणार असून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार आहेत. दुसरीकडे अनेक मौलानांनी याचिका फेटाळल्यावर आनंद व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिल्याचे मजलिस उलमा-ए-हिन्दचे महासचिव मौलाना कल्बे जवाद नकवी म्हणाले. कुरानमधील एक ओळही कोणी बदलू शकत नाही. 26 आयात हटवणे तर दूरची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी दिली.
हेही वाचा -स्पुतनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी