नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषणाच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत दिल्ली सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हणणे सादर केले. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार सरकार दिल्लीमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर दिल्ली एनसीआर शेजारी असणाऱ्या राज्यांत लॉकडाऊन (lockdown near Delhi NCR) लागू झाले तर त्याचा फायदा होईल, असेही दिल्ली सरकारने म्हटले आहे.
काही उद्योग, वाहने आणि मशिनरींना काही वेळ वापर करण्यासाठी बंधन घालण्याबाबत केंद्र व राज्यांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिल्लीतील प्रदुषणाबाबत आपत्कालीन बैठक घ्यावी, दिल्लीमधील वाढत्या प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. आवश्यकता असेल तर लॉकडाऊन लागू करावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-वायू प्रदुषणाचा धोका; काही दिवस सोनिया, राहुल गांधींचा मुक्काम गोव्यात
प्रदूषणामुळे दिल्लीसह हरियाणामधील शाळा बंद
दिल्ली सरकारकडून प्रदूषणाला नियंत्रित आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत एका आठवड्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ हरियाणा सरकारने गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत आणि झज्जरमधील शाळा 17 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-दिल्लीतील प्रदुषणास पंजाब-हरियाणाची पिके जबाबदार; 'हा' काढला तोडगा..