अमरावती -आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एका दांपत्याने स्वत:च्या दोन मुलींचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मदनपल्ली येथे राहणाऱ्या पुरुषोत्तम नायडू आणि त्यांची पत्नी पद्मजा यांनी कलयुग सत्ययुगात बदलणार आहे, या आशेने त्यांच्या दोन मुलींची हत्या केली. मृत मुली काही तासांत दैवी शक्तीने जिवंत होतील, या अंधश्रद्धेतून हे खून करण्यात आले.
मुलींची हत्या केल्यानंतर वडिलांनी आपल्या सहकाऱ्याला याबद्दल माहिती दिली. चक्रावलेल्या सहकाऱ्याने संबंधित घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या कृत्यानंतर नायडू दांपत्याच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नव्हता. पुरुषोत्तम नायडू (एमएससी, पीएचडी) हे मदनपल्ली येथील शासकीय महिला पदवी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. ते महाविद्यालयाचे उपप्राचार्यही आहेत. त्यांची पत्नी पद्मजा यांनी पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिवाय, त्या सुवर्णपदक विजेत्या असून एका स्थानिक खासगी शाळेची प्राचार्या आहेत.
हेही वाचा - 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा ताडोबा दौऱ्यावर
या दांपत्याची मोठी मुलगी एलिकख्या (वय २७) ही भोपाळमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तर, लहान मुलगी साई दिव्या (२२) बीबीए पूर्ण झाल्यानंतर ए.आर.रहमान संगीत अकादमीत संगीताचा अभ्यास करत होती. कोरोना विषाणूमुळे लॉकडाउननंतर दोन्ही मुली आपल्या पालकांसह राहत होत्या.