नवी दिल्ली : भारतातील सुपर चोर बंटी उर्फ देवेंद्र सिंग याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्याचा 500 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून कानपूर येथून त्याला अटक केली. आरोपी बंटीने अलीकडेच दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास 2 येथील घरांमध्ये चोरीची घटना घडवली होती. बॉलीवूडमध्ये बंटी चोरवर एक चित्रपटही बनला आहे. ‘ओये लकी लकी ओये’ या सुपरहिट चित्रपटातही बंटी चोरचे कारनामे दाखवण्यात आले होते. तो बिग बॉस फेमही राहिला आहे. पोलीस पथकाने आरोपी बंटी चोर याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
सुपर चोर बंटीची कथा: सुपर चोर बंटी हा मूळचा विकासपुरी, दिल्लीचा आहे. नववीत नापास झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला खूप मारलं. त्यामुळे रागावून तो घरातून निघून गेला आणि त्यानंतर घरी परतला नाही. 1993 मध्ये बंटीने पहिल्यांदा चोरीची घटना घडवली होती. तेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला पकडले, मात्र तो पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. यानंतर बंटीने दिल्ली, जालंधर, चंदीगड, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि चेन्नई येथे शेकडो चोरी केल्या आहेत. तो ‘सुपर चोर बंटी’ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे.