नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्ली एम्समध्ये मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहणानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले.
महात्मा गांधींना प्रेरणा मानत असत : बिंदेश्वर पाठक हे मूळचे बिहारमधील हाजीपूरचे आहेत. त्यांनी आज सकाळीच ट्विट करून देशवासियांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बिंदेश्वर पाठक महात्मा गांधींना प्रेरणा मानत असत. एका मुलाखतीदरम्यान पाठक यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे त्यांचे प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले होते. गेल्या ५३ वर्षात त्यांनी शौचालये स्वच्छ करणाऱ्या व हाताने सफाई करणाऱ्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी मोठे काम केले आहे. देशातील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगची प्रथा संपवणे हा त्यांचा उद्देश होता.
पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिंदेश्वर पाठक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान आहे. ते दूरदर्शी होते, ज्यांनी सामाजिक प्रगतीसाठी आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यांनी स्वच्छ भारत मिशनला महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला, असे ट्विट मोदींनी केले.