जयपूर Sukhdev Singh Gogamedi Murder Case : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून हत्या केल्याप्रकरणी महत्त्वाची बातमी आहे. गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी श्यामनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये निवर्तमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्याचवेळी शीला शेखावत यांनी रात्री आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलन थांबविण्याची घोषणा केली. तसंच श्याम नगर पोलrस स्टेशनचे अधिकारी मनीष गुप्ता आणि एका बीट कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलं.
आज होणार अंत्यसंस्कार : एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात येत आहे. गुरुवारी त्यांच्या मूळ गावी गोगामेडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचं मान्य करण्यात आलंय, अशी माहिती आमदार मनोज न्यांगळी यांनी दिलीय. आरोपींच्या अटकेसाठी राजपूत समाजाकडून 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी जाहीर केलं की, महिपाल सिंग मकराना, करणी सेनेचे अधिकारी आणि पोलिस यांच्यात झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. गोगामेडी येथे अंत्यदर्शनासाठी आज पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
एफआयआरमध्ये काय म्हटलंय : एफआयआरमध्ये गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी आरोप करत दावा केलाय की, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं 14 फेब्रुवारी 2023 रोजी पंजाब पोलिसांनी राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कळवले होतं. इतके इनपुट असूनही, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलीस महासंचालकांसह जबाबदार अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून माझ्या पतीला सुरक्षा दिली नाही.