नवी दिल्ली : फसवणूक प्रकरणी दिल्लीच्या तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना हिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चाहत खन्ना हिने नुकत्याच एका मुलाखतीत दावा केला होता की, सुकेश चंद्रशेखरने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र सुकेशने पत्र लिहून हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. आता शुक्रवारी सुकेशने टीव्ही कलाकार चाहत खन्ना हिला 100 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
बिनशर्त माफी मागण्यास सांगितले : सुकेशच्या वतीने त्याच्या वकिलाने सुकेशची प्रतिमा खराब केल्याप्रकरणी 100 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये चाहत खन्ना हिला अपमानजनक विधान केल्याबद्दल बिनशर्त माफी मागण्यास आणि १०० कोटींचा दंड भरण्यास सांगण्यात आले आहे. चाहत खन्ना या मुलाखतीत जे बोलले त्यामुळे सुकेश चंद्रशेखर यांची प्रतिमा खराब झाली आणि त्यांना मानसिक त्रास झाला, असे नोटीशीत म्हटले आहे. नोटीस पाठवताना सुकेशच्या वकिलाने माफी मागून 7 दिवसांत मीडियासमोर निवेदन देण्याचे सांगितले आहे. चाहत खन्ना हिने असे केले नाही तर तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
कार्यक्रमाच्या नावाखाली दिल्लीला बोलावले : 29 जानेवारीला एका मुलाखतीत चाहत खन्ना म्हणाली होती की, तिला एका कार्यक्रमाच्या नावाखाली मुंबईहून दिल्लीला बोलावण्यात आले होते. तेथे पिंकी इराणी असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिला कार्यक्रमाऐवजी तिहार तुरुंगात नेले, जिथे तिची सुकेशशी भेट झाली. चाहतच्या म्हणण्यानुसार, सुकेशने तिची भेट एका लोकप्रिय साऊथ टीव्ही चॅनलची मालक आणि जयललिता यांची पुतणी म्हणून केली होती. चाहत खन्ना हिने असाही दावा केला होता की, सुकेशने तिला एका गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केले होते. या दाव्यानंतर सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहून सांगितले की, तो व्यवसायासंदर्भात चाहतला भेटला होता आणि ती त्याला चित्रपट निर्मितीची ऑफर देण्यासाठी आली होती.
सुकेशचे अनेकांवर गंभीर आरोप : सुकेशने प्रपोज केल्याचा दावा फेटाळल्यानंतर आता त्याने ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर आपल्या पत्रांतून कलाकारांनाच नव्हे तर राजकारण्यांनाही लक्ष्य करत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी सुकेश चंद्रशेखर याने एकापाठोपाठ एक डझनभर पत्रे लिहून तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावे लेफ्टनंट गव्हर्नर आणि माध्यमांना पत्रे पाठवून अनेक आरोप केले होते. कोर्टात फसवणूकी प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यानही तो आपल्या आरोपांवर ठाम राहिला आहे.
हेही वाचा :Lalu Prasad Yadav News : 'आता तुम्ही वडिलांची काळजी घ्याल', लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांची भावनिक पोस्ट