प्रयागराज (उत्तर प्रदेश) Suheldev Express Derailed : प्रयागराज इथं मंगळवारी रात्री गाझीपूरहून आनंद विहार टर्मिनलकडे जाणारी सुहेलदेव एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठा रेल्वे अपघात टळला. प्रयागराज जंक्शनवरून गाडी बाहेरच्या क्रॉसिंगवर येताच प्रवाशांनी भरलेल्या या ट्रेनच्या इंजिन आणि जनरेटर डब्यात मोठा आवाज झाला. त्यानंतर रेल्वेची चाकं रुळावरून घसरली. जोरात आवाज आणि धक्क्यानं चालती गाडी रुळावरून घसरल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनेनंतर सुहेलदेव एक्स्प्रेस अडीच तासांनंतर दिल्लीकडे रवाना करण्यात आली. तर रुळावरून घसरलेले इंजिन व जनरेटर वाहन पुन्हा रुळावर आणण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कोणत्याही गाड्यांवर परिणाम नाही : उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित मालवीय यांनी सांगितलं की, या अपघातामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा इतर कोणत्याही गाड्यांना याचा फटका बसला नाही. अपघाताचं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. रात्री उशिरापासून घटनास्थळी तपासाचं काम सुरू झालं. तपास अहवाल आल्यानंतर अपघाताचं कारण समजू शकेल, असंही उत्तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अमित मालवीय सांगितलंय.
सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल : मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सुहेलदेव एक्स्प्रेस प्रयागराज जंक्शनवरून दिल्लीकडे रवाना झाली. मात्र काही क्षणांतच जोराचा धक्का आणि आवाज झाल्यानं ट्रेन थांबली. यानंतर ट्रेनमधील प्रवासी घाबरून बोगीतून बाहेर आले. तेव्हा त्यांना रेल्वेचे इंजिन आणि जनरेटर वाहनाची चार चाके रुळावरून घसरल्याचं समजलं. गाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच उत्तर मध्य रेल्वेचे डीआरएम हिमांशू बडोनी आणि इतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसंच या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि रेल्वे अभियंते घटनास्थळी पोहोचले.