लखनऊ (उत्तर प्रदेश) Subrata Roy Heir :सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचं मंगळवारी (१४ नोव्हेंबर) रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. सुब्रत यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा वारसा कोण सांभाळणार, असं प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सुब्रत रॉय यांनी त्यांच्या मृत्यूच्या सात दिवस आधी लिहिलेल्या पत्रातून याचं उत्तर मिळालं आहे.
कोणाला दिली जबाबदारी : सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांनी समूहाच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत ओपी श्रीवास्तव यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. सुब्रत रॉय यांचं प्रदीर्घ आजारानं मंगळवारी निधन झालं असले तरी त्यांच्या मृत्यूच्या सात दिवसांपूर्वी त्यांना याची माहिती होती. त्यामुळे त्यांनी ७ नोव्हेंबरला एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी कंपनीचे सर्व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार ओपी श्रीवास्तव यांना दिल्याचं नमूद केलं आहे. ओपी श्रीवास्तव हे सुब्रत रॉय यांचे चांगले मित्र आणि कंपनीत सेकंड इन कमांड होते.
कोण आहेत ओपी श्रीवास्तव : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे रहिवासी ओपी श्रीवास्तव हे सुब्रत रॉय यांचे पहिले भागीदार मानले जातात. त्यांनी कंपनी स्थापन करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हटलं जातं. त्यांची गणना सुब्रत रॉय यांच्या विश्वासू लोकांमध्ये केली जाते. सहारासमोर सर्व संकटे असतानाही त्यांनी सुब्रत रॉय यांची बाजू सोडली नाही. सुब्रत राय यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्वप्ना राय, भाऊ आणि कंपनीचे कमर्शियल उपव्यवस्थापकीय संचालक जेबी राय आणि मोठा मुलगा व कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे कार्यकारी संचालक सुशांतो राय हे आहेत.
देशभरात २ लाख कोटी रुपयांची मालमत्ता : सहारा समूहाच्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मौल्यवान मालमत्ता आहेत. मात्र, या मालमत्तांची विक्री करण्यास बंदी आहे. विक्रीतून मिळालेली रक्कम न्यायालयाच्या परवानगीनं सहारा-सेबीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सहारा समूहाने तीन वर्षांपूर्वी दावा केला होता की, त्यांचे २२ हजार कोटी रुपये सहारा-सेबी खात्यात जमा झाले आहेत. सेबीच्या सर्व प्रयत्नांनंतरही गुंतवणूकदार न मिळाल्यास ही रक्कम परत मिळू शकते. याशिवाय या समूहाची देशभरात २ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावाही केला जात आहे.
हेही वाचा :
- Subrata Roy Death : 11 लाख लोकांना रोजगार देणारी कंपनी ते तुरुंगात रवानगी, सुब्रत रॉय यांचा 'असा' होता उद्योगविश्वातील प्रवास