जयपूर(राजस्थान) - दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हवालदार लक्ष्मण, हवालदार सचिन अशोक गुंडके आणि हवालदार सुभाष पांडुरंग नरके यांना एसीबीने जयपूरमध्ये अटक केली आहे.
- राजस्थान एसीबीच्या स्पेशल टीमची कारवाई -
राजस्थान एसीबीच्या स्पेशल टीमने जयपूरमध्ये सापळा रचून या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 89 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दोन लाख रुपयांची लाच घेताना या आरोपीना रंगेहाथ पकडले आहे.
- एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन हवालदारांना अटक
दरम्यान, एका प्रकरणासंदर्भात तक्रारदाराच्या वडिलांविरोधात मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात तक्रारदाराच्या वडिलांना अटक होऊ नये म्हणून बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व तीन हवालदारांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने याची माहिती जयपूर एसीबी कार्यालयाला दिली. यानंतर एसीबीचे एडीजी दिनेश एमएन यांच्या पथकाने सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन हवालदारांना अटक केली आहे.