नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress President Sonia Gandhi ) यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी कायम ठेवायची आहे. परंतु, त्यांनी स्थानिक घटकांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यास सांगितले आहे. एआयसीसीचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ईटीव्ही भारतला सांगितले की, “राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे हा सोनियाजींचा आदेश आहे."
म्हणून कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार - 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युती सत्तेवर आली. तेव्हापासून, सेनेच्या मंत्र्यांकडून त्यांना योग्य निधी आणि लक्ष मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याआधी अनेकदा ठामपणे सांगितले आहे की, पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष स्वबळावर बहुमत मिळवेल. विकास निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. मुद्दा नवीन नाही. फेब्रुवारीमध्ये एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
ज्येष्ठ मंत्र्यांच्या विरोधात तक्रार - इतकेच नाही तर काँग्रेसमध्येही अधूनमधून धुसफूस सुरू आहे. 5 एप्रिल रोजी 22 आमदारांच्या शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीत समन्वयाचा अभाव आणि विकासकामांसाठी सरकारी निधीची उपलब्धता न होणे. यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधातही तक्रार केली होती. एच. के. पाटील यांनी सत्ताधारी आघाडीत किंवा मोठ्या जुन्या पक्षांतर्गत फूट असल्याच्या बातम्यांना वाचा फोडली. “सर्व भागीदार सत्ताधारी आघाडीसाठी बांधील आहेत. काही वेळा संवादाअभावी छोट्या-छोट्या समस्या उभ्या राहतात पण मुख्यमंत्र्यांकडून त्यांची दखल घेतली जाते,” असेही ते म्हणाले.