नवी दिल्ली : एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या नवी दिल्लीतील घरावर दगडफेकीची घटना समोर आली आहे. ही दगडफेक का करण्यात आली?, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. ओवेसी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या : मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील ओवेसी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
पोलिसांत तक्रार दाखल : नवी दिल्लीच्या अशोक रोड भागातील ओवेसी यांच्या निवासस्थानी सायंकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त डीसीपीच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. पोलीस पथकाने घटनास्थळाचा तपास करून पुरावे गोळा केले आहेत. याप्रकरणी ओवेसी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दगडफेक : पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, हल्लेखोरांच्या टोळक्याने दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. ओवेसी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रात्री साडेअकरा वाजता ते त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना खिडकीच्या काचा तुटल्याचे दिसले. तिथे आजूबाजूला दगड पसरले होते. चौकशी केल्यावर घरातील नोकराने घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही हल्लेखोरांनी निवासस्थानावर दगडफेक केली.
यापूर्वीही हल्ले झाले आहेत : ओवेसी म्हणाले की, यापूर्वीही त्यांच्या घरावर असे हल्ले झाले आहेत. हा चौथा हल्ला आहे. त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे तक्रार पत्रात म्हटले आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल. दोषींना तात्काळ पकडले पाहिजे. हे अत्यंत सुरक्षित क्षेत्र असूनही अशा प्रकारे तोडफोडीचे प्रकार घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तक्रारीत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत ओवेसी म्हणाले की, दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी.
हेही वाचा :Shiv Jayanti In JNU : जेएनयूत शिवजयंतीवरून राडा, महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविपचा आरोप