नई दिल्ली -राजस्थानमधील उदयपूरमध्ये मंगळवारी भरदिवसा एका शिंप्याची हत्या करण्यात आली. मारेकर्यांनी घटनेचा व्हिडिओ आणि नंतर प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून वातावरण बिघडवले होते. यानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्येही कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
इमाम बुखारी यांनी व्हिडिओ मेसेज जारी करून म्हटले आहे की, कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची रियाझ आणि घौस नावाच्या दोन व्यक्तींनी केलेली हत्या ही अमानवी घटना आहे. इतकंच नाही तर पवित्र प्रेषितांच्या नावाने हे भ्याड कृत्य तर आहेच, शिवाय इस्लामविरोधी, बेकायदेशीर आणि अमानवीही आहे. जे दोषी असतील त्यांना सोडता कामा नये, असेही ते म्हणाले.