लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश): भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी चिंताजनक म्हणावी अशी घटना उघडकीस आली आहे. एक चिनी नागरिक व्हिसा नसताना थेट भारताच्या राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आला होता. दिल्लीत फिरून झाल्यनंतंर हा चिनी नागरिक नेपाळच्या सीमेवरून परत जाण्याच्या तयारीत होता. मात्र सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्याकडे व्हिसाची मागणी केली. त्याच्याकडे व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
नेपाळच्या सीमेवरूनच घुसला होता भारतात:भारत-नेपाळ सीमेवरील गौरीफंटा सीमेवर चिनी नागरिक आल्यानंतर नेपाळमधून हा चीनी नागरिक भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती भारतीय यंत्रणांना मिळाली. शुक्रवारी सीमेला लागून असलेल्या गौरीफंटा चेकपोस्टवर एसएसबीच्या गस्तीदरम्यान एका चिनी नागरिकाला सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले. एसएसबीचे असिस्टंट कमांडंट गौरीफंता यांनी चिनी नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरु:एसएसबीने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या चिनी नागरिकाने आपले नाव वांग गाओजुन असल्याचे सांगितले. जो चीनच्या दाद प्रांतातील रहिवासी होता. यादरम्यान एसएसबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे व्हिसा आणि पासपोर्ट मागितला असता चिनी नागरिक व्हिसा दाखवू शकला नाही. मात्र, चिनी नागरिकाकडून नेपाळचा व्हिसा जप्त करण्यात आला आहे. चिनी नागरिकाची चौकशी केल्यानंतर एसएसबीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. भारत-नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या गुप्तचर यंत्रणाही चिनी नागरिकाची चौकशी करून तपशील गोळा करत आहेत.