इरोड (तामिळनाडू): आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे बुधवारी सकाळी तामिळनाडूमधील इरोड येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातील (STR) आदिवासी वस्ती असलेल्या उकिनियम येथे उतरवण्यात आले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. रविशंकर यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये आणखी तीन जण होते. त्यामध्ये दोन सहाय्यक आणि एक पायलट यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत.
खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग:मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर एका खासगी हेलिकॉप्टरने बेंगळुरूहून तिरुपूरला जात होते. कदंबूरचे पोलीस निरीक्षक सी वादिवेल कुमार यांनी सांगितले की, सकाळी १०.१५ वाजता हेलिकॉप्टर एसटीआरवरून जात असताना, खराब हवामानामुळे वैमानिक पुढे जाऊ शकला नाही. त्यांनी सांगितले की, या कारणास्तव पायलटने हेलिकॉप्टरचे या ठिकाणी आपत्कालीन लँडिंग केले. त्याच वेळी, हवामान स्वच्छ झाल्यानंतर 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.
एक तासानंतर पुन्हा उड्डाण:तामिळनाडू पझांगुडी मक्कल संगमचे राज्य कोषाध्यक्ष के रामास्वामी हे सीपीआयचे माजी आमदार पीएल सुंदरम यांच्या विनंतीवरून उकिनियाम गावात पोहोचले. त्यांनी सांगितले की, ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत हेलिकॉप्टरला पुढे जाण्याची परवानगी मिळाली होती. हेलिकॉप्टर त्या गावात सुमारे एक तास थांबले आणि त्यानंतर सकाळी 11.30 च्या सुमारास तिरुपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला.