कोलंबो:आणीबाणीच्या नियमांनुसार, अध्यक्षांना पुर्ण अधिकार राहतील, ते कोणत्याही मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात आणि कोणत्याही परिसराची झडती घेऊ शकतात. ते कोणताही कायदा बदलू किंवा रद्दही करू शकतात. राष्ट्रपतींच्या घराजवळ झालेल्या निदर्शनांनंतर अनेकांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका दिवसात हा आदेश निघाला. रविवारी सार्वजनिक निषेधाचे आवाहनही करण्यात आलेले आहे. राजपक्षे यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री निदर्शना दरम्यान हिंसाचारासाठी हजारो निदर्शकांमधील संघटित आंदोलकांना दोषी ठरवले, जिथे पोलिसांनी अश्रुधुर आणि पाण्याचे फवारेसोडले होते. तसेच 54 जणांना अटक केली होती यावेळी अनेक लोक जखमी झाले आहेत.
आंदोलनाचे प्रतिनिधीत्व करणारे वकील नुवान बोपेजे यांनी सांगितले की, त्यांच्यापैकी अनेकांना विविध वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. राजधानी कोलंबोच्या उपनगरात लागू करण्यात आलेला पोलिस कर्फ्यू शुक्रवारी सकाळी उठवण्यात आला. दीर्घकाळ वीज खंडित होणे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यासाठी आंदोलक राजपक्षे यांना दोष देत आहेत. श्रीलंकेवर कर्जाचा डोंगर झाला आहे. तसेच परकीय गंगाजळी कमी होत चालली आहे, आयातीसाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच्या रांगेत थांबतात आणि वीजनिर्मिती करणारे संयंत्र चालवण्यासाठी पुरेसे इंधन नसल्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे जलविद्युत क्षमता कमी झाल्यामुळे दररोज अनेक तास वीज खंडित होत आहे.