हैदराबाद - राज्यातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर विविध राजकीय पर्याय तपासले जात आहेत. त्याअनुषंगाने सर्वच पक्षांचे प्रयत्न आणि बैठका सुरू आहेत. आज याच पार्श्वभूमिवर शिवसेना, भाजप, काँग्रेसची बैठक झाली. या बैठकांमध्ये पुढील रणनिती ठरवण्यात आली.
शिवसेना बैठक - शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत काही प्रमुख प्रस्ताव पारित करण्यात आले. त्यामध्ये एक म्हणजे शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही नावे कोणीही वापरू शकत नाहीत असा दुसरा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्याचबरोबर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही पक्षप्रमुखांना असतील असा तिसरा प्रस्ताव पारित करण्यात आला. हे सर्व प्रमुख प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी उद्ध ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
शिंदे बैठक - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही आज गुवाहाटीमध्ये फुटीर आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये पुढे काय पावले उचलायची याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने त्यांच्या गटाचे नाव ठरवण्यात आले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव या गटाला देण्याचे ठरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर शिंदे गटाने आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा केला. यासंदर्भात एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्र पाठवून आपला गट खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळावी असा दावा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट आणि त्यांच्या निर्णयावरच शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शिंदे काय राजकीय खेळी करतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहाटीत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रावर यावे म्हणतात, आणि आमच्या ऑफिस, घरावर हल्ले होतात. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी शपथीचे पालन करावे आणि त्यांनी आपले कर्तव्यपूर्ण करून हे थांबवण्याचे आदेश द्यावेत. शिवसेना कोणीही हायजॉक केलेली नाही असेही ते म्हणाले. आमदारांना दिलेल्या नोटीसांना उत्तर दिले जाईल. त्यामध्ये 24 तासांचा वेळ दिलेला आहे. त्यांना एक आठवड्याचा वेळ मागणार आहोत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.