मुंबई - मोसमी वारे (मॉन्सून) केरळमध्ये (Monsoon In kerala) दाखल झाले आहेत. आज (ता. ३१) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ, घट होत असून, उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. कोकणात कमाल तापमान ३३ ते ३६ अंश, मध्य महाराष्ट्रात २७ ते ३९ अंश, मराठवाड्यात ३८ ते ४० तर विदर्भात ३८ ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे.
उत्तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीजवळच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून नैऋत्य मोसमी बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर बांगलादेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. ३१) तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.९, धुळे ३९.०, जळगाव ३९.४, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर २७.१, नाशिक ३३.८, निफाड ३५.४, सांगली ३५.४, सातारा ३४.६, सोलापूर ३८.२, सांताक्रूझ ३४.५, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ३८.४, परभणी ३९.३, नांदेड ३९.८, अकोला ४०.८, अमरावती ४०.२, बुलडाणा ३८.५, ब्रह्मपुरी ४२.५, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४२.०, नागपूर ४२.८, वर्धा ४१.२, यवतमाळ ४०.५.