नवी दिल्ली -गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधन दरवाढीबाबत चींता व्यक्त केली आहे. पत्राद्वारे इंधन दरवाढ कमी करून मध्यम वर्गीय आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इंधन दरवाढीने गाठलेला उच्चांक ऐतिहासिक आणि अव्यवहारिक आहे. देशातील अनेक भागात 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. यामुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती मध्यम स्तरावर आहेत. विशेष म्हणजे, युपीए सरकारच्या काळापेक्षा आता इंधन तेलाच्या किंमती कमी आहेत, असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकाराच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत. मात्र, सरकार याचे खापर मागील सरकारवर फोडत आहे. सरकारने राज धर्माचे पालन करावे, आणि इंधनच्या किंमती कमी कराव्यात, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सरकारने कारणे देण्याऐवजी मार्ग शोधावा. चांगली सेवा भारतीयांना मिळायला हवी, असेही त्या म्हणाल्या.