नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाच्या या संकटात अनेकांचा बळी गेला आहे. अनेक मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यावरील पालकांचे छत्र हरवले आहे. अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आवाहन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे.
सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र कोरोना साथीच्या भयावह परिस्थितीत बर्याच मुलांनी आई व वडिल यांच्यापैकी एकाला गमावले आहे. ही मुले संकटात आहेत. यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही. अशा मुलांच्या घरात कोणीही कमावणारा नाही. या मुलांना चांगले भविष्य देणे ही एक राष्ट्र म्हणून आपली जबाबदारी आहे, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान आणि पती राजीव गांधी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या नवोदय विद्यालयांचा उल्लेख करत सोनिया गांधी म्हणाल्या, की देशभरात 661 नवोदय विद्यालय आहेत. तिथे या पीडित मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुधारले जाऊ शकते.
इतर राज्यांची अनाथ मुलांना मदत -
कोरोना साथीच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूनंतर देशातील अनेक राज्यात नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच पालक गमावलेल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठीही पावले उचलली जात आहेत. ज्या कुटुंबात कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबाला 50 हजार रुपये दिले जातील. तर ज्या मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना वयाच्या 25 व्या वर्षांपर्यंत अडीच हजार रुपये मदत म्हणून दिले जातील. तर मध्य प्रदेश सरकारने कोरोना महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.