नवी दिल्ली :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील जवाहर भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, राजीव गांधी हे भारतात असलेल्या विविधतेच्या सुरक्षेचे आणि संवर्धनाचे समर्थक होते. ते म्हणायचे की, धार्मिक, वांशिक, भाषा आणि संस्कृती साजरे करूनच देशाची एकात्मता मजबूत होऊ शकते. या वस्तुस्थितीबद्दल ते अत्यंत संवेदनशील होते. सोनिया गांधी यांनी राजीव गांधींना त्यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील 'वीर भूमी' येथे पुष्पांजली वाहिली.
राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सोहळा : सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात सांप्रदायिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्श अधिक महत्त्वाचे आहेत. परंतु, द्वेषाचे राजकारण, समाजात फूट, धर्मांधता आणि पूर्वग्रहाचे राजकारण करणाऱ्या शक्ती अधिक सक्रिय होत आहेत. सत्ताधारी सरकारचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे इतर नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
राजीव गांधी अतिशय संवेदनशील : यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, देशातील विविधतेबाबत राजीव गांधी अत्यंत संवेदनशील होते. ते देशासाठी समर्पित होते. त्यांनी पंचायत आणि नगरपालिकांमध्ये महिलांच्या एक तृतीयांश आरक्षणासाठी लढा दिला. आज ग्रामीण आणि शहरी संस्थांमध्ये 15 लाखांहून अधिक महिला लोकप्रतिनिधी निवडून आल्या आहेत, हे केवळ राजीव गांधींचे परिश्रम आणि दूरदृष्टीमुळेच शक्य झालं आहे. त्यांचे सरकार असताना त्यांनी मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केले.
निवडणूक रॅलीदरम्यान हत्या : राजीव गांधी यांनी 1984 मध्ये त्यांची आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 1984 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ते वयाच्या 40 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी 2 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदुर येथील निवडणूक रॅलीदरम्यान हत्या झाली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी रविवारी 25 वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार राजस्थानमधील महिलांसाठी निवासी संस्था वनस्थली विद्यापीठाला प्रदान केला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत संस्थेचे सिद्धार्थ शास्त्री यांच्याकडे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा :
- Rahul Gandhi Marriage : राहुल गांधींचे लग्न कधी होणार? सोनिया गांधी म्हणाल्या...
- Karnataka Election 2023: कर्नाटकची जनता 'तुमच्या' आशीर्वादावर अवलंबून नाही; सोनिया गांधींचा भाजपला टोला
- Sonia targets Modi Govt : सोनिया गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्ला