नवी दिल्ली- मोदी सरकारने महामारीकडे दुर्लक्ष केल्याने देशाला भयानक किंमत मोजावी लागत असल्याची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कोरोना संकटाच्या व्यवस्थापनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) आज बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत चर्चा केली. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, की आपण कार्यकारी समितीची बैठकीत १७ एप्रिलला भेटलो होतो. गेल्या चार आठवड्यांत कोरोना महामारीची स्थिती आणखी विनाशकारी झाली आहे. प्रशासन आणखी अपयशी ठरले आहे.
हेही वाचा-'भाजपशासित राज्यांमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातींमध्येच'
पक्षीय हितासाठी सुपर स्प्रेडर कार्यक्रमांकडे दुर्लक्ष
वैज्ञानिक सल्ल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याने देशाला भयानक किंमत मोजावी लागत आहे. सुपर स्प्रेडरसारख्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक पक्षाच्या फायद्यासाठी संरक्षण देण्यात आले. अनेक वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संपूर्णपणे लॉकडाऊन घोषित केल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.