नवी दिल्ली :महिला आरक्षण संसदेत मांडण्यात आल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. मंगळवारी सकाळी संसदेत पोहोचल्यानंतर सोनिया गांधी यांना महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत आणण्याबाबत विचारले. त्यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, ते आमचे विधेयक आहे.
काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार रजनी पाटील आणि कुमारी शैलजा यांनीदेखील महिला आरक्षणावर प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या, की भाजपा फक्त महिला सक्षमीकरणावर बोलत आहे. मोदी सरकार 9 वर्षे का वाट पाहत होते? गोवा काँग्रेसचे माजी प्रमुख गिरीश चोडणकर यांच्या माहितीनुसार काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकावरील भाजपाच्या प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी रणनीती आखलीय. काँग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव केल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनं माजी पंतप्रधान राजीव गांधी हे महिलांच्या सक्षमीकरणाविषयी काय बोलले या गोष्टी ट्रेंड करण्यास सुरुवात केली.
सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे विधेयक पहिल्यांदा 1996 मध्ये एच.डी. देवेगौडा सरकारने सादर केलं होतं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारनं 2008 मध्ये महिला आरक्षण हा कायदा लागू केला. हे विधेयक 2010 मध्ये राज्यसभेनं मंजूर केला होता. परंतु हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले नाही. त्यामुळे 2014 मध्ये विधेयक मंजूर न झाल्यानं कायदा रद्द झाला.