नवी दिल्ली:नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या राज्याच्या प्रदेश अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. जेणेकरून राज्य काँग्रेस समित्यांची पुनर्रचना करता येईल.'
रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संघटनात्मक निवडणुका पूर्ण होईपर्यंत त्यांनी या पदावर कायम राहावे आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे सांगितले होते.