लडाख : लडाखमधील सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी २६ जानेवारीपासून ५ दिवसांचे उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. खारदुंगला पासवर उणे ४० अंश तापमान आणि १८ हजार फूट उंचीवर उपोषण करणार असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. यासोबतच त्यांनी आपल्या मागण्यांबाबत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही :ट्विट करून सोनम वांगचुक म्हणाले की, लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही! माझ्या नवीन व्हिडियो मार्फत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करून लडाखला सुरक्षा प्रदान करण्याचे आवाहन करतो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, सरकार आणि जगाचे लक्ष वेधण्यासाठी मी २६ जानेवारीपासून खारदुंगला पास येथे 18000 फूट उंचीवर -40 डिग्री सेल्सिअसमध्ये 5 दिवस क्लायमेट फास्ट वर बसण्याचा विचार करत आहे. सोनम वांगचुक यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये लडाखमध्ये पाण्याची समस्या गंभीर असल्याचे म्हटले आहे. येथे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच वर्षाला चार इंच पाणी बर्फाच्या रूपात खाली येते. ते पुढे म्हणाले की, येथील लोकांचे जीवन हिमनदीवर अवलंबून असून ते दररोज फक्त 5 लिटर पाण्यावर जगतात.
लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करा : सोनम वांगचुक आपल्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारला लडाखचा राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याचे आवाहन करत आहेत. व्हिडीओमध्ये त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि हिल कौन्सिल निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा समाविष्ट केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली.
सहावे शेड्यूल म्हणजे काय? :सोनम वांगचुक म्हणाले की, लडाख लष्करी दृष्टिकोनातूनही अतिशय संवेदनशील आहे. खारदुंगला हा नुब्रा व्हॅलीचा एक भाग आहे, जो सियाचीन ग्लेशियरजवळ पश्चिमेला पाकिस्तान आणि गलवान खोऱ्यात पूर्वेला चीनच्या सीमारेषा सामायिक करतो. माहितीनुसार, सन १९४९ मध्ये संविधान सभेने पारित केलेल्या सहाव्या अनुसूचीमध्ये स्वायत्त प्रादेशिक परिषद आणि स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत 'आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण' करण्याची तरतूद आहे. घटनेच्या कलम २४४ (२) आणि कलम २७५ (१) अंतर्गत ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. स्वायत्त जिल्ह्यांची स्थापना आणि पुनर्रचना करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश केल्याने या प्रदेशाची विशेष संस्कृती आणि जमिनीवरील हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात मदत होईल.
हेही वाचा :Rajnath Singh : भारत जोडो यात्रेवरून राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका