नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती. आता या प्रकरणात सुखविंदर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोवा उच्च न्यायालयाने सुखविंदर सिंगला जामीन मंजूर केला आहे. पीए सुधीर सांगवान यांच्यासह सुखविंदर सिंग याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते. यापूर्वी सुखविंदर सिंग याला ड्रग्ज प्रकरणातही जामीन मिळाला होता. गेल्या वर्षी 22-23 ऑगस्ट लसा सोनाली फोगटचा गोव्यातील कर्लीज बारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
गेल्या वर्षी २६ ऑगस्टला करण्यात आली होती अटक : सोनाली फोगटच्या हत्येचा गुन्हा प्रथम गोव्याच्या अंजुना पोलिसांनी नोंदवला होता. पण, नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. गोवा पोलिसांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक केली आणि तेव्हापासून दोघेही न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहेत. आता हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर सुखविंदर सिंगचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुखविंदर सिंग यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी सांगितले की, जामिनाच्या अटीनुसार सुखविंदर सिंग यांना गोव्याच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना नियमितपणे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल.