बंगळुरू -दारूचे व्यसन फार वाईट आहे. यामुळे स्वता:सह कुटुंबीयांनाही त्रास होतो. दारूसाठी पोटच्या पोराने आईची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये घडली. मुलगा लोकशला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोलाकल्मुरु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्मदात्री आईचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने 22 वर्षांच्या मुलाने 45 वर्षांच्या आईची निर्घ्रुण हत्या केली. लोकेश असे आरोपीचे नाव आहे. मद्यपान करून लोकेश घरी आला. पैशावरून त्याने आई रत्नम्मालासोबत भांडण कले. यावेळी रत्नम्माला यांनी पैसे देण्यास नकार दिला. वाद विकोपाला गेल्यावर त्याने रागाच्या भरात आईला जोरदार धक्का दिला. या धक्क्याने रत्नम्माला लोखंडी दाराला धडकल्या आणि त्यांना मार लागला. ही धडक इतकी जोरदार बसली की रत्नम्माला यांचा जागीच मृत्यू झाला.
दारूसाठी जन्मदात्या आईचा खून केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, पैसे देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून आईचा खून केल्याची घटना बुलडाण्यात घडली होती. तसेच मध्य प्रदेशमध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपीने 75 वर्षीय आईची पैसे न दिल्याने एका स्टीकने मारहाण करून हत्या केली होती.