नवी दिल्ली - औरंगजेब मार्गावर असलेल्या इस्रायलच्या दूतावासाबाहेर 29 जानेवरीला स्फोट झाला होता. या स्फोटानंतर देशभरात ठिकठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेवर इस्रायली राजदूत रॉन मालका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय तपास अधिकारी याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. भारताला जे काही सहकार्य हवे ते आम्ही देऊ, असे ते म्हणाले. भारत आणि इस्रायल दहशतवादाविरूद्ध तसेच इतर बर्याच गोष्टींसाठी एकत्र काम करत आहेत. कदाचित कुणालातरी भारत-इस्रायली द्विपक्षीय संबंध आवडत नसतील, असे रॉन म्हणाले.
इस्रायल आणि भारत यांच्यातील मैत्री आणि सहकार्य निरंतर आणि वेगाने वाढत आहे. दोन्ही देशातील संबंधाना एका आठवड्यापूर्वी 29 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याच दिवशी अतिरेकी हल्ला झाला. हा काही योगायोग असू शकत नाही. कोणीतरी आम्हाला काही संदेश पाठवू इच्छित असेल. कदाचीत कुणालातरी भारत-इस्त्रायल संबंध आवडत नसावेत. भारत आणि इस्रायलमधील वाढत्या मजबूत संबंधांमुळे त्यांना धोका निर्माण होण्याचीही शक्यता असू शकते, असे ते म्हणाले.
प्राथमिक तपासणीदरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, कमी तीव्रतेचा स्फोट करण्यामागील हेतू हा फक्त संदेश देण्यामागचा होता. या स्फोटानंतर सुरक्षा संस्था हाय अलर्टवर आहेत. कारण हा स्फोट एखाद्या मोठ्या षडयंत्राची एक चाचणी असू शकते, असे भारतीय तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
जैश-उल-हिंद संघटनेने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी -
जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच घटनास्थळावरून एक धमकीचे पत्रही पोलिसांना मिळाले होते. या पत्रातील माहितीतून स्फोटामागे इराण कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. 'हा स्फोट फक्त एक ट्रेलर आहे, असे पत्रात म्हटले होते. भविष्यात आणखी हल्ले करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा पत्रातून देण्यात आला होता. तपास करताना पोलिसांनी दूतावास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दोन युवक कॅबमधून येत असल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. स्फोट झाला त्या घटनास्थळावरून काही अंतर दूर ते उतरले. त्यानंतर काही अंतर पायी चालत त्यांनी स्फोटके ठेवली. पोलिसांनी कॅब चालकाचा शोध घेवून त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.