नवी दिल्ली :भारताचे चंद्रयान ३ बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले. यासह भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलेल्या चार देशांमध्ये सामील झाला आहे. भारताच्या या यशाबद्दल जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. मिशनच्या यशाबद्दल अमेरिकेतील भारतीय दूतावासात मिठाई वाटण्यात आली.
नासाने केले अभिनंदन : इस्रोच्या यशस्वी मोहिमेसाठी नासाने भारताचे अभिनंदन केले. 'चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल @ISRO चे अभिनंदन! तसेच चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश बनल्याबद्दल #भारताचे अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे!' असे ट्विट नासाने केले.
सोशल मीडियावर अभिनंदनाचा ओघ : इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा ओघ सुरू आहे. 'आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान आहे', असे ट्विट प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले. 'धन्यवाद, धन्यवाद, @ISRO. आपल्या क्षमतेवर विश्वास कसा ठेवावा, अपयशाला कसे सामोरे जावे आणि त्याचा व्यासपीठ म्हणून वापर कसा करावा, हे तुम्ही आम्हाला शिकवले, असे आनंद महिंद्रा म्हणाले. चांद तारे तोड लाऊं….सारी दुनिया पर में छाऊं. आज भारत आणि @isro ने कमाल केली. सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन... चंद्रयान-३ यशस्वी झाले आहे, असे ट्विट बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने केले.