नवी दिल्ली -तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. सोशल मीडिया आज जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फक्त एका क्लिकने, आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला जाऊ शकतो. हे सर्व सोशल मीडियाद्वारे शक्य झाले आहे. आज आपण 'सोशल मीडिया डे' साजरा करीत आहोत. दरवर्षी 30 जून रोजी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जातो. 2010 पासून दरवर्षी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जात आहे. या निमित्ताने सोशल मीडियाशी संबंधित मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
सध्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या फेसबूकच्याही पूर्वी 'सिक्सडग्रीस' (Sixdegress) नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आला होता. अँड्र्यू वाईनरिक यांनी 'सिक्सडग्रीस' लाँच केले होते. त्यानंतर 2001 मध्ये हे बंद करण्यात आले. सुरुवातीला फ्रेंडस्टर, मायस्पेस आणि फेसबुकचा वापर लोकांशी संवाद साधण्यासाठी केला गेला. फ्रेंडस्टर आणि लिंक्डइन 2002 मध्ये लाँच केले गेले होते. तर मायस्पेस 2003 मध्ये लाँच झाले होते. भारतीय वंशाच्या रामू यमलंची यांनी 2003 मध्ये ‘हाय फाइव्ह’ या सोशल मीडिया व्यासपीठाची सुरुवात केली. या पाठोपाठ ‘गुगल’ने ‘ऑर्कुट’ नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 2004 ला लाँच केला होता. त्यानंतर 2006 मध्ये मार्क झुकेरबर्गने ‘फेसबुक’ या सोशल मीडिया व्यासपीठाची सेवा जगभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झाकोळली गेली.
30 जून 2010 रोजी मॅशेबलच्या वतीने जागतिक सोशल मीडिया डेची सुरूवात झाली. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहूनही आपण सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतो. फक्त संवादामध्ये नाहीत कर व्यवसाय आणि जाहिरात जगातही प्रचंड क्रांती झाली आहे. आता ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसारखे प्लॅटफॉर्मही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत.