पहा काय म्हणाल्या स्मृती इराणी नवी दिल्ली :लोकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी मोठा आरोप केला. स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर फ्लाईंग किस केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींकडे इशारा करत त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी येथून जाताना महिला खासदारांच्या दिशेने असभ्य हावभाव केले. स्मृती इराणींनी थेट राहुल गांधींचे नाव घेतले नाही. मात्र याबाबत त्या सभापतींकडे तक्रार करणार आहेत.
स्मृती ईराणी यांचे गंभीर आरोप : 'मी एका गोष्टीवर आक्षेप नोंदवते. जे येथे माझ्याआधी बोलले, त्यांनी इथून जाताना असभ्यता दाखवली. अशी अभद्र वागणूक याआधी कधी सदनात दिसली नाही. ही यांची खरी ओळख आहे. आज हे देशाला कळाले. त्यांना महिलांच्या उत्थानाची चिंता नाही. त्यांचे महिलांबद्दलचे वागणे आज सर्वांसमोर आले आहे', असे गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी केले आहेत.
मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे : तत्पूर्वी, स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या 'मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली' या वक्तव्यावर जोरदार टीका केली. 'भारताची हत्या झाली या व्यक्तव्यावर विरोधक टाळ्या वाजवत आहेत', असे चित्र संसदीय लोकशाहीत प्रथमच दिसले, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांचे अविश्वास प्रस्तावावरील भाषण झाल्यानंतर लगेचच बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. सभागृहात आज जसे वर्तन झाले, त्याचा मी निषेध करते. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणी 'भारताच्या हत्येबद्दल' बोलले आणि काँग्रेस नेते त्यावर टाळ्या वाजवत होते, अशी टीका त्यांनी केली.
मणिपूरची फाळणी झालेली नाही : 'मणिपूरची फाळणी झालेली नाही. हे राज्य या देशाचा भाग आहे. विरोधी आघाडीतील एका सदस्याने तामिळनाडूमध्ये भारत म्हणजे फक्त उत्तर भारत असे म्हटले होते. हिंमत असेल तर राहुल गांधींनी यावर भाष्य करावे', असा घणाघात इराणी यांनी केला. 'आणखी एका काँग्रेस नेत्याने सांगितले की काश्मीरवर सार्वमत व्हायला हवे. हे विधान काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशानुसार देण्यात आले होते का? असा सवालही स्मृती इराणी यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा :
- Rahul Gandhi in Parliament Updates :आम्ही शौचालयावर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात- स्मृती इराणी
- Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले आज अदानीवर बोलणार नाही