पाटणा Smart Helmet :आपल्यादेशातील अनेक दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय बाईक चालवतात. अशावेळी अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय भारतात बाईक चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडतात. या दोन्ही समस्यावर बिहारच्या तरुणांनी एक अनोखा उपाय शोधून काढलाय. या तरुणांनी असं हेल्मेट बनवलं आहे, त्याच्याशिवाय बाइक सुरूच होत नाही!
- दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर स्मार्ट हेल्मेट बनवलं : बिहारचे चार तरुण, आर केसरी, यश केसरी, प्रिया आणि रोशनी भारती यांनी हे हेल्मेट बनवलं आहे. या चौघांच्या टीमनं दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर हे स्मार्ट हेल्मेट बनवलं. ईटीव्ही भारतशी बोलताना आर केसरी यांनी सांगितलं की, या हेल्मेटचं वैशिष्ट्य म्हणजे जर कोणी हेल्मेट वापरत असेल तर त्यानं हेल्मेट घातल्याशिवाय त्याची बाइक सुरू होणार नाही.
बाईकच्या चावीसोबत हे हेल्मेट असणंही खूप गरजेचं आहे. डोक्यावरून हेल्मेट काढताच गाडी थांबते. अनेक वेळा असं पाहायला मिळतं की, लोकं हेल्मेट घालत नाहीत आणि मग अपघाताचे बळी पडतात. अशा परिस्थितीत हे हेल्मेट अतिशय प्रभावी आहे. - आर केसरी, स्मार्ट हेल्मेट निर्माता
हेल्मेटला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळालं आहे : यश केसरी यांनी सांगितलं की, हे हेल्मेट बाईक चोरी रोखण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. 'माझं हेल्मेट अगदी सामान्य हेल्मेटसारखे दिसत असलं तरी ते सामान्य नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी हेल्मेट रस्त्यावर फेकून त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, तेव्हा हेल्मेटवर एक ओरखडाही नव्हता. या हेल्मेटला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळालं आहे. या हेल्मेटमध्ये एक डिव्हाईस बसवण्यात आलं आहे, तर एक डिव्हाईस बाईकमध्ये बसवलंय. ज्या बाईकमध्ये हे डिव्हाईस बसवलं आहे ते हेल्मेटशी मॅच केलंय.
- हेल्मेटचे फिचर्स : हेल्मेटमध्ये बसवलेलं हे उपकरण चार्ज करता येतं. एका दिवसाचं चार्जिंग तब्बल १० दिवस बॅकअप देतं. यासोबतच बॅटरी किती टक्के चार्ज झाली हे सांगणारं इंडिकेटरही बसवण्यात आलं आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये ऑटो कट देखील बसवण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही रात्री चार्जिंग सुरू केल्यास ते चार्जिंगनंतर आपोआप बंद होतं.