उन्नाव (उ. प्रदेश) : डंपरने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या तिघांना धडक दिली. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या मारुती कारलाही या डंपरने धडक दिली. मारुती कारमधून तीन जण प्रवास करत होते. या अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली होती. एडीएम वित्त आणि महसूल नरेंद्र सिंह यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
संतापलेल्या लोकांचा चक्का जाम : आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर एसपींसह अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. रेस्क्यू टीमने हायड्रा क्रेनच्या सहाय्याने डंपर हटवण्याचे काम सुरु केले. या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही लोकांनी मारहाण केली. या चकमकीत एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक किलोमीटर जाम झाला होता. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे.
असा झाला अपघात : कानपूर-लखनौ महामार्गावर रविवारी रात्री उशिरा आई व मुलगी अशा दोघी जणी चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी लखनौकडून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. त्यानंतर डंपरने शेजारी उभ्या असलेल्या सायकलस्वाराला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मारुती कारलाही धडक दिली. डंपरने धडक दिल्यानंतर त्याने मारुती कारला काही अंतरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहिती मिळताच एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांच्यासह अनेक पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. खाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हायड्रा क्रेनच्या सहाय्याने डंपर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी प्रथम आई-मुलीचे आणि दुचाकीस्वाराचे मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठवले. यानंतर डंपरसमोर अडकलेल्या मारुती कारची सुटका करण्यात आली.