कोलकाता - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये होणारी निवडणूक लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत असून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडूनसुरू आहेत. राज्यातील परिस्थिती जम्मू काश्मीरपेक्षाही वाईट झाली असून राज्य "दहशतवादी आणि देशद्रोहींच एक केंद्र बनले आहे, असे पश्चिम बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बरानगरमध्ये ते बोलत होते.
अल-कायदाच्या सहा दहशतवाद्यांना आयपूरदूरमधून (उत्तर बंगाल) अटक करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी दशतवाद्यांचे नेटवर्क तयार झाले आहे. दहशतवाद्यांना भारतात प्रशिक्षण दिले जात असून बांगलादेशात अशांतता पसरवण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत आहे, असा दावा बांगलादेशच्या नेत्या खालिदा झिया यांनी अलीकडचे केला होता. तोच धागा पकडत दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगाल अतिरेकी आणि देशद्रोही यांचे केंद्र बनले आहे. बंगालची परिस्थिती आता काश्मीरपेक्षा वाईट आहे, असे घोष पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
बंगालमधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. "माझे नावदेखील देशविरोधी लोकांच्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट आहे. अलीपुरद्वार जिल्ह्यातील जयगाव येथे माझ्यावर हल्ला झाला. जेथे रोहिंग्या मुस्लिमांना ठेवण्यात आले होते, असं घोष म्हणाले. राज्यातील काही राजकीय पक्ष दहशतवाद्यांना संरक्षण देत आहेत, असेही ते म्हणाले.
...तर आम्हाला फरक पडत नाही -
ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. यावर दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली. बर्याच गोष्टी घडू शकतात. अनेक राजकीय पक्ष येथे येऊन निवडणूक लढवतात. त्यामुळे भाजपाला काही फरक पडत नाही. आमच्या पक्षाने राज्यात चांगले वातावरण तयार केले आहे. बंगालमधील सुमारे 45 टक्के लोकांनी भाजपाला मतदान केले. त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. टीएमसी, माकप, काँग्रेस, एआयएमआयएम सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात. ज्याला विकासाची इच्छा आहे, तो पक्ष एकीकडे असेल आणि अशांतता निर्माण करू इच्छित असलेले पक्ष दुसरीकडे असतील, असेही ते म्हणाले.