गांधीनगर : एकीकडे लसीकरणासाठी उभारलेल्या केंद्रांवर लांबच लांब रांगा पहायला मिळताना, गुजरातच्या कच्छमध्ये वेगळंच चित्र दिसत आहे. कच्छच्या भुज प्रशासनाने लोकांना आरामात लसीकरण करता यावे यासाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सुरु केले आहे. यामुळे तुम्हाला लस घेण्यासाठी तुमच्या गाडीतून उतरण्याचीही गरज पडत नाही.
असे काम करते ड्राईव्ह इन लसीकरण..
यासाठी तुम्हाला आधी लसीकरणासाठी नाव नोंदणी करुन, ठराविक वेळ निश्चित करावी लागते. ही नोंदणी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून करता येते. यानंतर निश्चित केलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या गाडीत या लसीकरण केंद्रावर जायचे असते. भुजमधील लसीकरण केंद्र हे आर.डी. वारसानी विद्यालयाच्या मैदानावर आहे. याठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा नंबर येण्याची वाट पहावी लागते. तुमचा नंबर आला, की वैद्यकीय कर्मचारी तुमच्या गाडीजवळ येऊन तुम्हाला लसीचा डोस देतात.