सिरसा /हरियाणा Sirsa Car Accident : हरियाणातील हिस्सारला जात असताना कार अपघात झालाय. कारचा वेग खूप असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात झालाय. यामध्ये तीन महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय. यातील पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान, यातील मृतदेह शवविच्छेदनासाठी डबवली येथील उपविभागीय सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तेथील पोलीस अधिकारी सुमेर सिंह, राजीव कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केलाय.
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात होतं कुटुंब : बनवारी लाल वर्मा, दर्शना बनवारी वर्मा, कृष्ण कुमार वर्मा, गुड्डी देवी कृष्ण कुमार वर्मा, ओमप्रकाश वर्मा, चंद्रकला ओमप्रकाश वर्मा आणि कार चालक सुभाष चंद्र अशी मृतांची नावं आहेत. यातील दर्शना देवी यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक पिराथी सिंह यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे सर्व कुटुंब हिस्सारला जात होते. परंतु, या कुटुंबावरच काळाने घाला घातला. दुपारी 1 वाजता श्रीगंगानगर येथून ते हिसारसाठी जात होते.
पाच जणांचा जागीच मृत्यू : शेरगड गावाजवळ कारवरील नियंत्रण सुटून कार विरुद्ध दिशेने गेली. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ती जोरात आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, बनवारी लाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बनवारीलाल हे बांधकाम कंत्राटदार असल्याचं सांगितलं जातंय. डबवली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी एसआय शैलेंद्र कुमार यांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. नातेवाईकांच्या जबाबानंतर मंगळवारी पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
भरधाव वेगात कार झाडावर आदळली : डबवली पोलिस ठाण्याचे प्रभारी (शहर) उपनिरीक्षक शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, कार चालकाच्या झोपेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यावरून लक्षात येतं की कार खूप वेगात होती. तसेच, तपासात गाडीचे ब्रेक लागले नाहीत, असंही समोर आल्याचं त्यांचं मत आहे.