मुंबई : सर रतनजी जमशेटजी टाटा हे ब्रिटीश राजवटीत भारतीय फायनान्सर आणि फिलांथेरपिस्ट होते. रतनजी टाटा यांचा जन्म 20 जानेवारी 1871 रोजी ब्रिटिश भारतातील बॉम्बे येथे झाला. प्रख्यात पारशी व्यापारी जमशेटजी टाटा हे त्यांचे वडील होते. रतन टाटा यांचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले आणि त्यानंतर त्यांनी वडिलांच्या फर्ममध्ये प्रवेश केला. 1904 मध्ये थोरल्या टाटांच्या मृत्यूनंतर, रतन टाटा आणि त्यांचे भाऊ दोराबजी टाटा यांना वारसाहक्काने खूप मोठी संपत्ती मिळाली. यापैकी बरीच संपत्ती त्यांनी व्यावहारिक स्वरूपाच्या परोपकारी कार्यांसाठी आणि भारताच्या संसाधनांचा विकास करण्यासाठी व विविध औद्योगिक उपक्रमांच्या स्थापनेसाठी समर्पित केली.
लंडन विद्यापीठात रतन टाटा फंडाची स्थापना केली : सर रतन टाटा यांना 1916 मध्ये नाइटची पदवी देण्यात आली होती. त्यांनी त्यांचे कार्य भारतापुरतेच मर्यादित ठेवले नाही. 1912 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये रतन टाटा सामाजिक विज्ञान आणि प्रशासन विभागाची स्थापना केली. तसेच लंडन विद्यापीठात रतन टाटा फंडाची स्थापना केली. त्यांचे इंग्लंडमधील यॉर्क हाऊस, ट्विकेनहॅम येथे कायमस्वरूपी वास्तव्य होते. 1909 मध्ये त्यांनी रु. 50,000 (2022 मध्ये अंदाजे रु. 40 दशलक्ष समतुल्य) महात्मा गांधींना ट्रान्सवालमध्ये काम करण्याच्या भारतीयांच्या हक्काच्या लढ्यात मदत करण्यासाठी दान केले होते. ते कलेचे उत्तम जाणकार होते. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय) मध्ये सर रतनजी टाटा, सर दोराब टाटा आणि सर पुरुषोत्तम मावजी यांचे संग्रह प्रदर्शित करणारा एक विभाग आहे.