चंदीगड/मुंबई :कॅनडास्थित प्रसिद्ध पंजाबी गायक शुभनीत सिंग उर्फ 'शुभ'ची आगामी मुंबई कॉन्सर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कॉन्सर्टचे मुख्य प्रायोजक असलेल्या 'बोट' (boAt) या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडनं प्रायोजकत्व मागं घेण्याचा निर्णय घेतला. 'शुभ' नावानं प्रसिद्ध असलेला हा २६ वर्षीय पंजाबी गायक २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर परफॉर्म करणार आहे. शुभनीत सिंगवर तो कथित खलिस्तानचा समर्थक असल्याचा आरोप झाल्यानंतर 'बोट'नं हा निर्णय घेतला.
प्रायोजकत्व का घेतलंमागं: मंगळवारी 'बोट'नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर घोषणा केली की, या वर्षाच्या सुरुवातीला कलाकारानं केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे आम्ही त्याच्या कॉन्सर्टचं प्रायोजकत्व मागं घेत आहोत. संगीत समुदायाप्रती आमची बांधिलकी खोलवर असली तरी, आम्ही प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरे भारतीय ब्रँड आहोत, असं 'बोट'नं नमूद केलं. जेव्हा आम्हाला या वर्षाच्या सुरुवातीला 'शुभ'नं केलेल्या टिप्पण्यांबद्दल कळलं, तेव्हा आम्ही आमचं प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला, असं कंपनीनं सांगितलं.
शुभचा विरोध का : 'बोट' हा एक भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे, जो हेडफोन आणि ब्लूटूथ स्पीकर्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीचं मुख्य कार्यालय दिल्ली येथं आहे. ही कंपनी २०१३ मध्ये सुरू झाली होती. अमन गुप्ता हे 'बोट' चे फाऊंडर आणि सीईओ आहेत. गायक शुभवर तो खलिस्तानवादी घटकांना पाठिंबा देत असल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये भारताच्या नकाशात पंजाब आणि जम्मू-काश्मीरचा भाग वगळलेला होता.
विराट कोहलीनं अनफॉलो केलं : शुभ हा एलिव्हेटेड, ओजी, चेक्स, वी रोलिन आणि नो लव्ह यासारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जातो. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्याच्या गाण्यांना पसंती दिली जाते. क्रिकेटपटू विराट कोहली देखील शुभच्या एका गाण्यावर डान्स करताना दिसला होता. पण जेव्हा शुभची पोस्ट व्हायरल झाली, तेव्हा विराटनं त्याला अनफॉलो केलं. क्रिकेटर केएल राहुल आणि हार्दिक पंड्यानही त्याला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.
हेही वाचा :
- Canada Indian Diplomat : कॅनडातून भारतीय राजदूताची हकालपट्टी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी केले गंभीर आरोप; भारताचं प्रत्युत्तर
- India Canada Diplomat : जशास तसं, भारताचे कॅनडाच्या राजदूताला ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश