उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarakhand Tunnel Rescue:उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेला अखेर आज (२८ नोव्हेंबर) यश आलं. या बोगद्यात तब्बल ४१ कामगार अडकले होते. या मजुरांच्या सुटकेसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. आता या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. १७ दिवसांपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं? आणि गेल्या १७ दिवसांत काय-काय घटनाक्रम घडला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
१२ नोव्हेंबरला भूस्खलन झालं : उत्तरकाशीपासून ३० किलोमीटर अंतरावर सिलक्यारा येथे असलेला हा बोगदा ४.५ किमी लांब आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गावर तो बांधण्यात येतोय. येथे नेहमीप्रमाणे कामगार बोगद्याच्या बांधकामासाठी गेले होते. दरम्यान, १२ नोव्हेंबरला सकाळी ५.३० च्या सुमारास अचानक भूस्खलनाला सुरुवात झाली. यानंतर, काही कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आलं, मात्र बोगद्याचा ६० मीटर भाग कोसळला आणि त्यात ४१ कामगार अडकले.
पाइपलाईनद्वारे अन्न दिलं : या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी लगेच प्रयत्न सुरू करण्यात आले. कामगारांना बोगद्यात पाईपच्या मदतीनं ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय कॅमेरा आणि वॉकीटॉकी पाठवून त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. या कामगारांना तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा अन्न मिळालं. त्यांच्यासाठी पाइपलाईनद्वारे औषधं आणि फळं पाठवण्यात आली.
भारतीय सैन्याची मदत :या बचावकार्यात भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंगसाठी सैन्याच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी सैन्याच्या इंजिनीअर रेजिमेंटचे ३० जवान उपस्थित होते. त्यांनी ड्रोनद्वारे बोगद्याचं डिजिटल मॅपिंग केलं. दरम्यान, बचावासाठीचा नवा बोगदा खणताना ओगर ड्रिलिंग मशिन मध्येच तुटली. यानंतर पर्यायी उपाय म्हणून बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभ्या मार्गानं ड्रिलिंग करण्यात आलं. या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रॅट मायनिंगचा वापर करण्यात आला.
बचाव कार्यात विविध यंत्रणा सहभागी : या बोगद्यात अडकलेले कामगार सिलक्याराच्या बाजूनं आत गेले होते. ते ज्या बोगद्यात अडकले तेथे कामगारांना हालचाल करण्यासाठी ५० फूट रुंदीचा रोड आणि दोन किलोमीटर लांबीची जागा होती. कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी बचाव कार्यात मदत केली.
वेळ घालवण्यासाठी खेळ पाठवले : बोगद्यात अडकलेल्या कामगारांना शांत ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. यासाठी प्रशासनानं अनेक प्रयत्न केले. त्यांना बोगद्यात वेळ घालवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळासारखे खेळ पाठवण्यात आले होते. याशिवाय त्यांना योगासनाचाही सल्ला देण्यात आला. २६ नोव्हेंबरला कुटुंबीयांना संपर्क करण्यासाठी कामगारांना मोबाईल देण्यात आला होता.
हेही वाचा :
- उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन : बोगद्यातून सर्व 41 कामगारांना काढलं सुरक्षित बाहेर