गंगटोक / नवी दिल्ली Sikkim Flash Flood : उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर ढगफुटीमुळे तिस्ता नदीला अचानक पूर आल्यानं किमान 14 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 22 लष्करी जवानांसह सुमारे 102 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूमुखी पडलेल्या 10 नागरिकांची ओळख करण्यात आली असून, त्यापैकी तीन उत्तर बंगालमध्ये वाहून गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सकाळी बेपत्ता झालेल्या 23 सैनिकांपैकी एकाला बाचावण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
3000 हून अधिक पर्यटक अडकले : चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पहाटे दीडच्या सुमारास सिक्कीममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही. बी. पाठक यांनी सांगितलं की, देशाच्या विविध भागांतील 3,000 हून अधिक पर्यटक राज्याच्या विविध भागात अडकले असल्याची माहिती आहे. पाठक म्हणाले की, चुंगथांग येथील तिस्ता फेज 3 धरणावर काम करणारे अनेक कर्मचारीही अडकून पडले आहेत. पुरामुळं रस्ते पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पुरात एकूण 14 पूल कोसळले आहेत, त्यापैकी नऊ सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) अंतर्गत आहेत आणि पाच राज्य सरकारचे असल्याची माहिती मुख्य सचिव व्ही. बी. पाठक यांनी दिलीय.
आतापर्यंत 166 जणांची सुटका :आणखी एका अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, आतापर्यंत सुमारे 166 जणांची सुटका करण्यात आली असून यात एका लष्करी जवानाचाही समावेश आहे. बचाव करण्यात आलेल्या जवानाची प्रकृती स्थिर असल्यचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितलंय. बचाव कर्मचार्यांनी सिंगताममधील गोलितार येथील तिस्ता नदीच्या पुराच्या भागातून अनेक मृतदेह बाहेर काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पी एस तामांग यांच्याशी बोलून राज्यातील अचानक आलेल्या पुरामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिल्याचं अधिकार्यांनी सांगितलंय.