नवी दिल्ली - पंजाबमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असून आमदार नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोघांदरम्यान पोस्टर्स वॉरदेखील सुरू आहेत. गुरुवारी अमरिंदर सिंग यांनी आपल्या जवळच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर सिद्धू यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देणार असल्याच्या चर्चा फेटाळल्या. त्यानंतर दिल्लीतून सिद्धू यांना बोलावणे आले होते. आज सिद्धू यांनी सोनियांची भेट घेतली आहे. मात्र, बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. येत्या 2-3 दिवसांत पंजाब काँग्रेसमधील फेरबदलासंदर्भात अंतिम घोषणा करण्यात येणार आहे.