बेंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच हमीपत्रांना मंजुरी दिली आहे. बैठकीनंतर सिद्धरामय्या म्हणाले की, या हमीपत्रांना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर पुन्हा चर्चा होऊन त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. सिद्धरामय्या यांनी आज सकाळी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल : विधानसभेत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गृह ज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यामुळे सरकारला दरमहा 1,200 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत, आम्ही प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या खात्यात 2,000 रुपये जमा करू. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक बीपीएल कार्डधारकाला 10 किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महिलांना मोफत बस पास देणार : युवानिधी योजनेंतर्गत, पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेरोजगार असणाऱ्यांना दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपये दिले जातील. दरम्यान, त्यांना खासगी किंवा सरकारी नोकरी मिळाल्यास देयके बंद होतील. कर्नाटकात राहणाऱ्या महिलांना सरकार मोफत बस पास देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पाच प्रकल्पांवर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याची अधिकृत अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पक्षाला सत्तेत आणण्यासाठी काँग्रेसने पाच प्रमुख हमीभाव जाहीर केले होते.