नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन हल्लेखोरांसोबत गुन्हेगार गोगी याचाही मृत्यू झाला आहे.
जितेंद्र उर्फ गोगीवर होते 8 लाखांचे बक्षिस -
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाने जितेंद्र उर्फ गोगी याला 2020मध्ये ताब्यात घेतले होते. काउंटर इंटेलिजन्स टीमने त्याला गुरुग्राम येथून त्याच्या तीन साथीदारांसह ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यापूर्वी त्याच्यावर दिल्ली पोलिसांकडून 8 लाखांचे बक्षिस ठेवलेले होते. तो हत्या, अपहरण, पोलिसांवर हल्ला यासारख्या कुख्यात गुन्ह्यात सामील होता. ताब्यात घेतल्यानंतर त्याला कारगृहात ठेवण्यात आले होते.
वकीलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी केला गोळीबार -
शुक्रवारी तिसऱ्या बटालियनचे पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्सची टीम त्याला रोहिणी न्यायालयासमोर दाखल करण्यासाठी घेऊन आली होती. यावेळी वकीलाचा वेष परिधान करून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.