हल्दवानी (उत्तराखंड)Death Of Elephants In India :देशात हत्तींसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आलीय. गेल्या 14 वर्षात देशातील विविध राज्यांमध्ये 1 हजार 357 हत्तींचा मृत्यू झाल्याचं आरटीआयमध्ये उघड झालंय. यापैकी 897 हत्तींचा विजेचा धक्का लागून, 228 हत्तींचा ट्रेनच्या धडकेनं, 119 हत्तींचा शिकारीमुळं मृत्यू झालाय. तर 40 हत्तींना विषबाधा झाल्याचं माहितीतून उघड झालंय.
आरटीआयमध्ये हत्तींबाबत मोठा खुलासा :उत्तराखंडच्या हल्दवानी येथील रहिवासी आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया यांनी सांगितलं की, जून महिन्यात त्यांनी केंद्रीय जन माहिती अधिकारी, पंतप्रधान कार्यालयाकडून काही माहिती मागवली होती. प्रोजेक्ट एलिफंटची देखरेख करणारे तज्ञ डॉ. मुथामिझ सेल्वन यांच्याकडून या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. देशातील बहुतांश हत्तींचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झाल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलंय.
14 वर्षात 1 हजार 357 हत्तींचा अकाली मृत्यू :गेल्या 13 वर्षात 898 हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. हत्तींच्या मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे रेल्वेची धडक असल्याचं सांगितलं जातंय. रेल्वेच्या धडकेनं 228 हत्तींना जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये ट्रेनच्या धडकेने 27 हत्तींचा मृत्यू झाला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील अरुणाचल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरामसह देशात हत्तींची संख्या 10 हजार 139 आहे.