नवी दिल्ली -उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घ्यावी असे सांगितले. ते म्हणाले की महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार असल्याने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, पुढील आठवड्यात पाच न्यायाधीशांना एकत्र करणे शक्य होणार नाही आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला हिवाळी सुट्टी असेल. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगाच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि शिवसेना गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील प्रतिस्पर्धी गटाने दाखल केलेल्या याचिका विचारार्थ घेतल्या. या खंडपीठात न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा यांचाही समावेश आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कोणत्या गटाला 'खरा' शिवसेना पक्ष म्हणून मान्यता द्यायची आणि धनुष्य-बाण चिन्हाचे वाटप करण्याची परवानगी दिली होती.
आता राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या संदर्भात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ सिंदे गट या दोघांनी दाखल केलेल्या याचिकांची पुढील सुनावणी 13 जानेवारी 2023 रोजी घेणार असल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण सुरुवातीला 29 नोव्हेंबर 2022 रोजी सुनावणीस घेतले जाणार होते.