पणजी-शिवसेनेने छोट राज्य असणाऱ्या गोव्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा खासदार संजय राऊत म्हणाले, की आमचे गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक आहे. नाही तर आमचे आम्ही लढू, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे खासदार राऊत म्हणाले, की लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो-खो खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. निवडून आलेले पक्ष बदल करत आहेत. ज्या पक्षात जात आहेत, त्यांना लाज नाही, असे म्हणत फुटीर नेत्यांवर खासदार संजय राऊत यांनी शरसंधान केले. पक्ष फोडले जातात. त्यानंतर सत्ता हस्तगत केली जाते. महाराष्टात आम्ही पक्ष फोडले नाहीत. तर आम्ही तीन पक्ष एकत्र आल्याचे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा-पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता
गोव्यात पुढील निवडणुकीत आप, तृणमूलसारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकद आहे. आम्ही 22 जागा लढविणार आहोत. गोव्याचे सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस घातला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आला. ते कॅसिनोचे समर्थन करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली.
हेही वाचा-गोवा काँग्रेसमध्ये गटबाजी; आमदारकीचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो तृणमूलच्या वाटेवर
खासदार राऊत म्हणाले, की आम्ही तिकडे २२ जागांवर लढू. आज संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा व जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजपा तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला भाजपाचाच पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे.
हेही वाचा-गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश; कोलकात्यात ममता बॅनर्जींची घेतली भेट
गोवा राज्यात इतर पक्षांसोबतच तृणमूलचे वारे
राज्याचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फलेरो यांनी बुधवारी कोलकात्याला जाऊन तृणमूल पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत राज्यातील अन्य दहा नेत्यांनी यावेळी तृणमूलमध्ये प्रवेश केला. फलेरो यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून नुकताच आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे सुपूर्त केला होता. गोवा राज्यात इतर पक्षांसोबतच तृणमूलचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. राज्यात यापूर्वीच सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, मगो, गोवा फॉरवर्डसोबत राज्याबाहेरील 'आप'ने निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यातच बुधवारी तृणमूल काँग्रेसने राज्याच्या राजकारणात हालचाली सुरू केल्या आहेत.