मुंबई-शिवसेना आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शिवनसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना कालच गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे. पुण्यात शिवसैनिकांनी राडा केला आहे. याचे लोण आता राज्यभर पसरण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचा इशारा -संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही हार मानणार नाही. फ्लोअर टेस्ट आम्हीच जिंकणार. ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे काम केले. आमची पूर्ण तयारी आहे, तुम्ही या, असे ते म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी यातून गद्दारांना इशारा दिला होता. महाविकास आघाडी मजबूत, सरकार अडीच वर्षे पूर्ण करून सत्तेत राहील असेही राऊत म्हणाले होते. अल्टिमेटम संपले आहे, असे सांगून संजय राऊत यांनी इशारा दिला.
एकनाथ शिंदे यांचे पत्र - संजय राऊत यांनी इशारा दिल्यानंतर फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनीही पत्र लिहून आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेतल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. आम्ही कुणा एका पक्षाचे आहोत म्हणून आम्हाला सुरक्षा दिली नव्हती. तर आम्हाला धोका आहे म्हणून सुरक्षा दिली होती, असे शिंदे त्यांच्या पत्रात लिहितात. तसेच आता महाविकास आघाडी सरकारमधील लोकांच्याकडूनच आम्हाला धोका आहे. त्यामुळे आम्हाला राज्य सोडून जावे लागल्याचीही भीती शिंदे यांना पत्रात व्यक्त केली आहे. सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेचे खच्चिकरण केले आहे. आमदारांच्या संरक्षणाची जवाबदारी राज्य सरकरावर आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने आमची सुरक्षा काढल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन प्रसिद्ध केलेल्या पत्रात केला आहे. यामुळे आपण आणि आपले कुटुंबीय धोक्यात आल्याचे शिंदे म्हणतात.