शिमला :हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार केला आहे.समरहिल येथील शिवमंदिर परिसरात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 नागरिक दबलेले असल्याची शंका प्रशासनाला आहे. मात्र आतापर्यंत फक्त 11 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. सोमवारी 8 जणांचे मृतदेह आढळून आले होते, तर आजपर्यंत पुन्हा तीन मृतदेह आढळून आले आहेत. आज सापडलेल्या मृतदेहातील दोन मृतदेहाची ओळख पटली आहे. यातील एक विद्यापीठातील सहायक प्राध्यापक मानसी यांचा तर दुसरा एचपीयूचे प्राध्यापक पी एल शर्मा यांच्या पत्नी रेखा शर्मा यांचा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नाल्यात आढळला मृतदेह :शिमल्यातील शिवमंदिर परिसरात झालेल्या भूस्खलनात मोठी जीवितहानी झाली आहे. बचाव पथकातील जवान शिवमंदिर परिसरात एक किलोमिटरपर्यंत शोध घेत आहेत. आज जवानांना एचपीयूमधील प्राध्यापक पी एल शर्मा यांच्या पत्नी रेखा शर्मा यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याची माहिती बचाव पथकातील सूत्रांनी दिली आहे.