तिरुअनंतपुरम Shashi Tharoor :ज्येष्ठकाँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केरळच्या तिरुअनंतपुरम येथून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. या जागेवरून पंतप्रधान मोदी जरी माझ्याविरुद्ध लढले, तर मी त्यांनाही पराभूत करू शकतो, असं थरूर म्हणालेत. शशी थरूर हे तिरुअनंतपुरमचे खासदार आहेत.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकेन : शशी थरूर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा तिरुअनंतपुरम मतदारसंघातून लढण्यास तयार आहेत. मात्र ही त्यांची शेवटची निवडणूक असू शकते, असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. त्याना विधानसभा निवडणूक लढवायची आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी विरोधात असले तरी मी कोणत्याही परिस्थितीत जिंकेन, असा दावा थरूर यांनी केला. मी येथून पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहे. मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल, असं त्यांनी नमूद केलं. केरळ विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का, असं विचारलं असता थरूर म्हणाले की, सध्या माझे लक्ष लोकसभा निवडणुकीवर आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार मी यावर विचार करेन.
परराष्ट्रमंत्री व्हायचं होतं : "मोदींनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मी जिंकेन. मी माझ्या रेकॉर्डच्या आधारावर निवडणूक लढवत आहे. जर लोकांना असं वाटत असेल तर त्यांना मला बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु मी कोणाविरुद्ध लढतोय यावर हे आधारित नाही. मी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा माझी इच्छा परराष्ट्रमंत्री व्हायची होती, ती पूर्ण झाली नाही. आता जनतेनं ठरवायचं आहे", असं थरूर म्हणाले.