नवी दिल्ली :जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी रात्री 11 वाजता फेसबूकवर ‘पापा नहीं रहे’ असे म्हणत त्यांच्या निधनाची माहिती दिली. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी : शरद यादव यांच्या निधनाने दुःख झाले. सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःला खासदार आणि मंत्री म्हणून वेगळे केले होते. डॉ. लोहिया यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली होती. मला नेहमी आमच्यातील झालेल्या संवादाची आठवण राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शरद यादव यांना श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधी :शरद यादव हे समाजवादाचे नेते असण्यासोबतच नम्र स्वभावाचे होते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. असे राहूल गांधी यांनी म्हटले आहे. याशिवाय अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रियंका गांधी :ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. शरद यादव हे नेहमी तत्त्वांच्या राजकारणाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्याला श्रींच्या चरणी स्थान देवो. सुभाषिनी यादव आणि त्यांच्या इतर कुटुंबियांना माझ्या संवेदना. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी शरद यादव यांना श्रद्धांजली वाहिली.
लालू प्रसाद यादव :शरद यादव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी मिळाली. मला खूप असहाय्य वाटत आहे. उपचारासाठी येण्यापूर्वी आमच्यात एक बैठक झाली. समाजवादी आणि सामाजिक न्याय प्रवाहाच्या संदर्भात आम्ही खूप विचार केला होता. शरद भाऊ... मला असा निरोप द्यायचा नव्हता. भावपूर्ण श्रद्धांजली! अशा भावना लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केल्या.
मल्लिकार्जून खरगे : देशातील समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक दशके उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाची सेवा करत त्यांनी समतेच्या राजकारणाला बळ दिले. त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांप्रती माझ्या मनापासून संवेदना. अशा शब्दात मल्लिकार्जून खरगे यांनी श्रद्धांजली वाहिली.
तेजस्वी यादव : ज्येष्ठ नेते, महान समाजवादी नेते आणि माझे पालक आदरणीय शरद यादव यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. त्यांच्या मृत्यूवर काहीही बोलण्यास असमर्थ आहे. आई आणि भाऊ शंतनू यांच्याशी चर्चा झाली. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण समाजबांधव कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. अशा भावना तेजस्वी यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड : समाजवादी चळवळीचे भक्कम आधारस्तंभ आणि न्यायप्रेमी समाजवादी नेते श्री.शरद यादव यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे..! मंडल आयोगाच्या निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. शरद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धांजली वाहिली.
विनोद तावडे : ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी JDU अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. भारताच्या राजकारणात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. असे म्हणत विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली.